कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताचे एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात व शिरूर तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाते. कोरेगाव भिमाजवळ भीमा नदीवर ब्रिटीशकालीन ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव मोहिते पूल असून पूर्वी हा पूल पुणे व विदर्भाला जोडण्याचे महत्त्वाचे काम करत होता.
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला असून भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते.
भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. भीमाशंकर येथे १०० मी. उंचीवर उगम पावल्यावर ती वाहतवाहत सपाट प्रदेशात येते. उगम पावल्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरापर्यंत भीमा अरुंद पात्रातून वाहते. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र तुळापूरजवळ इंद्रायणी नदी भीमेस मिळते इथे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. व पुढे याच भीमा नदीच्या काठावर कोरेगाव भीमा हे गाव वसले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पवित्र झालेली भूमी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक हे गाव कोरेगावपासून २ किमी वरती आहे.